अहिल्यानगरमधील शिर्डीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आलंय. या घटनेतील मृतांमध्ये साईबाबा संस्थानच्या दोन्ही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेचं सीसीटिव्ही फुटेज सर्वत्र व्हायरल होताच एकच खळबळ उडाली होती.
नेमकं काय घडलं होतं?
सुभाष घोडे हे ड्युटीवर येत होते. तर नितीन शेजुळ हे सुरक्षा कर्मचारी ड्यूटी संपवून घरी निघाले होते. तर कृष्णा देहरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते. त्यांच्यावर अत्यंत प्राणघातक हल्ला झाला. मोटारसायकलवर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशानं तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली. इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तीनही निरपराध नागरिकांवर चाकूनं असंख्य वार केले. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक ग्रामस्थ गंभीर जखमी झाले. ही हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
सुमारास कामावर जात असताना लुटमार करण्याच्या उद्देशाने अज्ञातांनी त्यांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. शिर्डी येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या प्रकरणी गुन्हा दाखल होताच किरण ज्ञानदेव सदाफुले वय 30 वर्षे, रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता.राहाता यास अटक करुन त्याची 07 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली. मात्र, सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा फरार होता अखेर काल 4 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या माहितीनूसार दुसरा आरोपी राजू उर्फ शाक्या अशोक माळी याचं पोलिसांनी अटक केलीय. या आरोपींची कसून चौकशी केली असता आपण लुटमार करण्याच्या उद्देशाने हत्या केली असल्याची कबुली किरण सदाफुले याने दिलीयं.