मौजमजेसाठी पैशाची कमी, नातवाने भलताच डाव आखला; ७२ वर्षीय आजीला चहातून विषारी औषध देत संपवलं
मौजमजेसाठी पैशाची कमी, नातवाने भलताच डाव आखला; ७२ वर्षीय आजीला चहातून विषारी औषध देत संपवलं
img
वैष्णवी सांगळे
कोल्हापुरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मौजमजा करण्यासाठी दागिने लुटण्यासाठी चहातून विषारी औषध पाजून चुलत नातवाने 
उषा मारुती भिऊंगडे (वय 72) यांचा खून केलाय. कोल्हापुरातील गंगावेश येथील ऋणमुक्तेश्‍वर मंदिराजवळील शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे.  याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने  मृत महिलेचा २० वर्षीय नातू प्रेम परशराम भिऊंगडे ( रा. चिंतामणी पार्क, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) याला अटक केलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा भिऊंगडे या पतीसह राहात होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाल्याने त्या घरामध्ये एकट्याच राहात होत्या. त्यानंतर पुतण्या परशराम त्यांना औषधे व इतर मदत करत होता. सोमवारी उषा या घरी बेशुद्ध पडल्या होत्या. त्यावेळी परशराम याने त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र त्या उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचवेळी उषा यांचा मृत्यू संशयास्पद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

 पोलिसांनी मृत महिलेचा दैनंदिन सवयी, त्यांच्यावर सुरु असलेले औषधोपचार, त्यांचे शेजारी व नातेवाईक अशा वेगवेगळ्या लोकांकडून माहिती घेऊन तपास केला. त्यावेळी मृत उषा यांचा चुलत नातू प्रेम मृत्यूच्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी घरी येऊन गेल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे प्रेम भिऊंगडे याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने आपल्या चैनीसाठी पैशांची गरज होती. त्याला उषा यांचे दागिने लुटायचे होते. म्हणून सोन्यात वापरण्यात येणारे विषारी रसायन मानवी जीवितास अपायकारक आहे, याची माहिती असताना ते चहामध्ये टाकले. तो चहा उषा यांना दिला. त्या चहा प्यायल्यानंतर बेशुद्ध पडल्या व त्यातच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती चौकशीवेळी दिली.

आपली आजी मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर प्रेमने उषा यांच्या दोन्ही हातातील सोन्याच्या सहा पाटल्या, गळ्यातील दोन सोन्याच्या चेन, उजव्या कानातील फुल अशा सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. उषा या वयोवृद्ध असल्याने त्यांचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याचा बनाव केला असल्याचे सांगितले.

सुरुवातीला मृत्यू नैसर्गिक असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू ठेवला. मृत महिलेचे काही दागिने गायब असल्याचे समजताच चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचा संशय बळावला. तांत्रिक तपासादरम्यान सोमवारी सकाळी प्रेम भिऊंगडे फ्लॅटमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि सहायक निरीक्षक सागर वाघ यांनी कसून चौकशी केली असता प्रेमने गुन्ह्याची कबुली दिली. दागिन्यांसाठी आजीला चहातून विष दिल्याचे त्याने मान्य केले.


इतर बातम्या
Join Whatsapp Group