मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती? जळालेली हाडं सापडली, पण बेपत्ता सरपंच...
मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती? जळालेली हाडं सापडली, पण बेपत्ता सरपंच...
img
वैष्णवी सांगळे
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगावचे सरपंच महेश पिळणकर गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. ११ जानेवारीला जंगलात पेटवलेले अवशेष पोलिसांना सापडले. मात्र सापडलेले अवशेष कोणाचे आहेत. याबाबत अद्याप तपास नाही. त्यामुळे पाटगावच्या सरपंचाचे नेमके काय झाले? याबाबत कोणालाच कल्पना नाही. कोल्हापूर पोलिसांकडून तपास रखडलेला असल्याचा आरोप कुटुंबियांकडून होत आहे. त्यामुळे आपल्या वडिलांचं आणि पतीच्या तपासाचे काय झालं? याची रोजच विचारना मुलगा पारस पिळणकर आणि पत्नी तृप्ती पिळणकर यांच्याकडून होत आहे. 

नेमकी घटना काय?
महेश पिळणकर हे ७ जानेवारीला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले. यावेळी तपासादरम्यान पाटगावलगत असलेल्या कुलकर्णी नावाच्या शेताजवळ त्यांची दुचाकी आढळून आली. धक्कादायक बाब म्हणजे दुचाकी सापडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर जंगलात जळालेल्या अवस्थेत काही अस्थी (हाडांचे अवशेष) सापडले होते. यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागले होते. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

या घटनेची माहिती मिळताच गडहिंग्लज उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले आणि भुदरगड पोलिस निरीक्षक गोरक्ष चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून जळालेले अवशेष जप्त करून ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. हे अवशेष मानवी आहेत की प्राण्यांचे, याचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे तपासाची दिशा स्पष्ट झालेली नाही.

पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून १०० हून अधिक जणांची चौकशी केली आहे. महेश पिळणकर हे नक्की कुठे आहेत, याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. राजकीय, व्यावसायिक किंवा वैयक्तिक वैमनस्यातून त्यांच्यासोबत काही गैरप्रकार घडला आहे का, यादृष्टीने तपास सुरू आहे. पिळणकर हे व्यवसायाने काजू उत्पादक आणि हर्बल व्यापारी असल्याने त्या क्षेत्रातील वादाचीही पडताळणी केली जात आहे. आज झालेल्या आंदोलनात महेश पिळणकर यांच्या पत्नी आणि कुटुंबयांनी “महेश पिळणकर यांचं झालं तरी काय?” असा सवाल उपस्थित करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

दरम्यान या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. संतोष देशमुख यांचेही अशाच प्रकारे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला होता. पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या बाबतीतही गाडी एका ठिकाणी आणि काही अंतरावर जळालेल्या अस्थी सापडल्याने, कोल्हापुरात मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती तर झाली नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group