"त्या" हत्या प्रकरणात मोठा खुलासा...! अंगावरच्या २२ टॅटूमधून पोलिसांनी शोधला आरोपी
img
Dipali Ghadwaje
वरळीत एका स्पामध्ये ५२ वर्षीय व्यक्तीच्या हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. वरळी नाका येथील स्पामध्ये गुरू वाघमारे उर्फ चुलबुल पांडे याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. खंडणीच्या त्रासाला कंटाळून सहा लाखांची सुपारी देत गुरु वाघमारे याची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. 

या प्रकरणात गुन्हे शाखेने तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. या या खुनाच्या घटनेत आरोपींना पकडताना धक्कादायक खुलासा झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार,. मृत गुरुच्या शरीरावर २२ नावांचे टॅटू होते. वाघमारे याने त्याच्या शत्रूंची नावे टॅटूच्या रुपात दोन्ही पायांच्या मांड्यावर कोरून ठेवली होती. या टॅटूमध्ये सुपारी देणाऱ्याचे नाव देखील असल्याचे समोर आलं आहे. 

पोलिसांसाठी खबऱ्या म्हणून काम करणाऱ्या गुरु वाघमारे याची स्पाच्या मालकानेच हत्या केल्याचे उघड झालं आहे. स्पा विरोधातील तक्रारी आणि खंडणीच्या त्रासाला कंटाळून स्पा मालक संतोष शेरकर यानेच हत्येची सुपारी दिली होती. शेरेकर यांचा वरळीतील सॉफ्ट टच स्पा आणि नालासोपारा येथील आरोपी फिरोज याचा स्पा वाघमारे याच्या तक्रारीमुळे बंद झाला होता. 

त्यामुळे फिरोजने शेरकरसोबत संपर्क साधत गुरु वाघमारेला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फिरोजने दिल्लीतील शाकिबला चार लाख रुपये देत हत्येचा कट रचला. तीन महिन्यांपासून गुरु वाघमारेला संपवण्याची तयारी सुरु होती.

५० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी गुरु वाघमारे वरळीतील स्पाच्या कर्मचाऱ्यांना आणि एका मैत्रिणीला घेऊन सायनच्या एका बारमध्ये गेला होता. तिथून मध्यरात्रीच्या सुमारात सर्वजण स्पामध्ये परतले. त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास दोघांनी स्पामध्ये घुसून वाघमारेची गळा चिरून हत्या केली. 

रात्री वाघमारेची हत्या झाल्यानंतर त्याच्या मैत्रिणीने गोष्ट सकाळी साडे नऊ वाजता शेरेकरला सांगितली. त्यानंतर शेरेकरने बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि वाघमारेच्या मैत्रिणीसह चार जणांची चौकशी सुरू केली होती.

हे ही वाचा >>>> पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीचा मोठा निर्णय; परीक्षा पद्धतीत होणार अनेक मोठे बदल

शवविच्छेदनादरम्यान, वाघमारेच्या मांडीवर पोलिसांना २२ नावे टॅटूच्या स्वरुपात आढळली. यामध्ये स्पाचे मालक शेरकर आणि फिरोज यांचाही समावेश होता. त्यानंतर पोलिसांनी या घटनेच्या संदर्भातील ठिकाणाचे सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये फिरोज आढळून आला. फिरोज सायनपासून वाघमारेच्या मागावर होता. तो बारच्या शेजारी असलेल्या टपरीवरुन गुटखा घेत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये आढळून आले. ७० रुपयांचा गुटखा खरेदी केल्यानंतर त्याने ऑनलाइन पेमेंट केले होते. पोलिसांनी गुगल पेमेंटच्या मदतीने नालासोपारा येथून फिरोजला अटक केली. त्यानंतर चौकशीत शेरेकर आणि शाकिबची नावे उघड झाली. 

दरम्यान, अनेकजण आपल्या जीवावर उठले आहेत याची वाघमारेला पूर्ण कल्पन होती. त्यामुळे ज्यांच्यापासून जीवाला धोका आहे अशांची नावे गुरु वाघमारे यांने मांडीवर गोंदवून घेतली होती. जर माझी हत्या झाली तर हे जबाबदार असतील, असेही त्याने टॅटूच्या स्वरुपात गोंदवून घेतलं होतं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group