वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळे संघ लोकसेवा आयोग चर्चेत आले आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससीची फसवणूक केल्याचे त्यांच्यावर आरोप होत असतानाच यूपीएसससीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आयोग आपल्या परीक्षा पद्धतीत बदल करण्याच्या तयारीत आहे. आयोग आपल्या परीक्षेवेळी नवीन डिजिटल तंत्रज्ञान वापरण्याच्या तयारीत आहे.
यामध्ये Adhar Card आधारित फिंगरप्रिंट तपासणी आणि फेस रिकगनीशन तंत्रज्ञान आणणार आहे. पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्र सादर करुन परीक्षा दिल्याचा आणि नोकरी मिळवल्याचा आरोप आहे.त्यामुळे विरोधकांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत, सर्वजण UPSC ला दोष देत आहेत. आयोगाच्या परीक्षा आणि निवड प्रक्रियेत गडबड असल्याची टीका सातत्याने होत आहे. आता हाच सर्व प्रकार थांबवण्यासाठी UPSC अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे.
UPSC दरवर्षी 14 परीक्षा घेते, ज्यात नागरी सेवा परीक्षेचाही समावेश आहे. या सर्व परीक्षांमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरले जाऊ शकते. UPSC आधार कार्ड आधारित फिंगरप्रिंट, Ai सीसीटीव्ही कॅमेरे, ई-ॲडमिट कार्ड/ क्यूआर कोड स्कॅनिंग अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार करत आहे. परीक्षेत उमेदवाराच्या जागी दुसरे कोणी बसवण्यासारखी फसवणूक टाळण्यासाठी आयोग हे पाऊल उचलू शकतो. यासाठी UPSC ने विविध कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे आगामी परीक्षांमध्ये या सर्व तंत्रज्ञानाचा वापर होण्याची शक्यता आहे.
काय आहे पूजा खेडकर प्रकरण?
महाराष्ट्र केडरच्या IAS अधिकारी पूजा खेडकर सध्या चर्चेत आहेत. सुरुवातीला त्या आवाजवी मागण्या केल्यामुळे चर्चेत आल्या होत्या. पण, हळुहळू त्यांनी परीक्षेत फसवणूक करुन पद मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. याप्रकरणी नवी दिल्लीमध्ये तक्रारदेखील दाखल करण्यात आली असून, याप्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. सध्या त्याचे प्रशिक्षणही थांबवण्यात आले आहे.