राज्यात वादग्रस्त ठरलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत आहेत. मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यातून पुणे पोलिसांनी पिस्तूल जप्त केले आहे. त्याचबरोबर पिस्तुलातील काही गोळ्या देखील जप्त केल्या आहेत.
पिस्तुलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचा मनोरमा खेडकर यांच्यावर आरोप आहे. त्यासाठी पौड पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर त्यांचे पिस्तूल जप्त केले आहे. मनोरमा खेडकर यांना अटक केल्यानंतर दोनदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
पहिल्यांदा दोन दिवस आणि दुसऱ्यांदा देखील दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीसांची चौकशी पूर्ण झाली असे मानून न्यायालयाने त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.त्यामुळे त्यांची रवानगी येरवडा कारागृह होऊ शकते.