पुण्यातील वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असणाऱ्या पूजा खेडकर यांची उमेदवारी UPSC नं अखेर रद्द केली आहे. आधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाील गैरवर्तन व त्यानंतर कागदपत्रांमध्ये आढळलेली कथित अनियमितता या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांची उमेदवारी यूपीएससीनं रद्द केल्याचं वृत्त समोर आले आहे.
विशेष म्हणजे यापुढे यूपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये पूजा खेडकर यांना बसता येणार नाही, असंही यूपीएससीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे यूपाएससीनं त्यांच्यावर ही कारवाई केलेली असताना दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अद्याप पतियाला कोर्टानं निर्णय दिलेला नाही.
पूजा खेडकर यांच्या उमेदवारीबाबत UPSC नं केलेल्या कारवाईबाबत एएनआयनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये माहिती दिली आहे. ‘यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांना देण्यात आलेली प्रोव्हिजनल उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. तसेच, यापुढील काळात यूपीएससीकडून घेण्यात येणारी कोणतीही परीक्षा त्यांना कधीच देता येणार नाही, असं यूपीएससीकडून सांगण्यात आलं आहे’, अशी माहिती एएनआयच्या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.