गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात चर्चेत आलेल्या माजी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता सुप्रीम कोर्टाने पूजा खेडकर यांना मोठा दणका दिला आहे. पूजा खेडकर यांच्यावर दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात त्यांनी दिल्लीच्या पतियाला कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण हा अर्ज आज न्यायालयाने फेटाळला आहे.
त्यामुळे आता दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकर यांच्या अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पूजा खेडकर या निकालाविरोधात पुन्हा वरच्या कोर्टात अपील करणार की नाही? याविषयी निश्चित माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पूजा खेडकर यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही क्रिमीलेअर सुविधेचा लाभ घेऊन ओबीसी कोट्यातून अर्ज केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय, बेकायदेशीरपणे दिव्यांग असल्याची चुकीची कागदपत्रे सादर केल्याचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यासंदर्भात UPSC व लाल बहादूर शास्त्री अकादमीकडून तपास केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या कारवाईपासून संरक्षम मिळण्यासाठी पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर दिल्लीच्या पतियाला कोर्टामध्ये सविस्तर सुनावणी पार पडली.
कोर्टात तीन बाजूंचा सविस्तर युक्तिवाद
दरम्यान, बुधवारी पतियाला कोर्टात झालेल्या सुनावणीत दिल्ली पोलीस, UPSC व स्वत: पूजा खेडकर यांच्यावतीने सविस्तर युक्तिवाद करण्यात आला. “जिल्हाधिकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले म्हणून आपल्याला लक्ष्य केलं जात आहे”, असा दावा पूजा खेडकर यांच्यावतीने करण्यात आला. तसेच, सर्व आरोप फेटाळण्यात आले. त्याचवेळी दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर यांच्याकडून खोटी कागदपत्रे सादर केल्याचा युक्तिवाद केला. तर यूपीएससीनं पूजा खेडकर यांनी फक्त आम्हालाच नाही, तर संपूर्ण समाजाला फसवलं आहे, असं म्हणत त्यांच्या अटकेची मागणी केली.
काय आदेश दिले न्यायालयाने?
बुधवारी पूजा खेडकर प्रकरणाची सविस्तर सुनावणी झाल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी पतियाला न्यायालयाने यासंदर्भातला निकाल दिला. त्यानुसार पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. “UPSC मधील आणखी कुणी पूजा खेडकर यांना या सगळ्या प्रकारात मदत केली आहे का? याचीही चौकशी दिल्ली पोलिसांनी करावी”, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
त्याचबरोबर, “पूजा खेडकर यांच्याव्यतिरिक्त इतर असे कोणते उमेदवार आहेत का ज्यांनी निकषांत बसत नसतानाही क्रिमीलेअर सुविधेचा लाभ घेऊन ओबीसी कोट्यातून अर्ज केला होता किंवा दिव्यंगत्वासाठीचे पात्रता निकष ओलांडले होते याचा तपास यूपीएससीनं करावा”, असे आदेश यावेळी न्यायालयाने दिले.