राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून अरविंद केजरीवाल यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. १० लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
या प्रकरणी गेल्या आठवड्यात सुनावणी पूर्ण झाली होती. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया यांचे खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 5 सप्टेंबर रोजी निर्णय राखून ठेवला होता. दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांच्यावर मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला होता. यावरुन सीबीआयने त्यांना अटक केली होती. यानंतर केजरीवाल यांनी या अटकेला आव्हान देणारी आणि जामीन मिळण्यासंदर्भातील अशा दोन स्वतंत्र सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 5 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकेवरील निकाल राखीव ठेवला होता. अखेर आज केजरीवालांना जामीन मंजूर झाला आहे.