महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असून राज्याचं लक्ष तिकडे लागलं आहे. मात्र, निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निवडणुकांसाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी केली होती. अखेर, राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला असून जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दोन आठवड्यांची मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्यात याव्यात, अशी डेडलाईन सर्वोच्च न्यायालयाने घालून दिली होती. त्यानुसार राज्यातील नगरपरिषदा-नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या, तर महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुमधडाका सुरू आहे. प्रशासकीय कारणास्तव १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता. यावर आज सुनावणी झाली.
यावेळी १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मुदतवाढ मिळाली आहे. आज (दि. १२) सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत राज्य निवडणूक आयोगाला १५ दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. तसेच १५ फेब्रुवारी पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला दिले आहेत.