प्रसिद्ध वकील हरीष साळवे ६८व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहल्यावर, ब्रिटीश महिलेशी बांधली लगीनगाठ
प्रसिद्ध वकील हरीष साळवे ६८व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहल्यावर, ब्रिटीश महिलेशी बांधली लगीनगाठ
img
Dipali Ghadwaje

प्रसिद्ध वकील हरीश साळवे वयाच्या 68 व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढले आहेत. यापूर्वी 2020 मध्ये हरिश साळवे यांनी दुसऱ्यांदा आपली लग्नगाठ बांधली होती.देशाचे माजी सॉलिसिटर जनरल आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे केंद्र सरकारच्या नव्यानं स्थापन झालेल्या वन नेशन वन निवडणूक समितीचे सदस्यही आहेत. 

हरीश साळवे यांनी नुकतंच त्रिना यांच्यासोबत थाटामाटात लग्न केलं आहे. त्रिना मुळची ब्रिटनची आहे. यापूर्वी, मीनाक्षी (पहिली पत्नी) आणि कॅरोलिन ब्रॉसार्ड (2020) यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. 

साळवे आणि त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी मीनाक्षी यांनी 38 वर्षांच्या सुखी संसारानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. जून 2020 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला असून दोघांना साक्षी आणि सानिया या दोन मुली आहेत. हरीश साळवे यांच्या लग्नाला नीता अंबानी, ललित मोदी आणि उज्ज्वला राऊत यांच्यासह जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. 

सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे 68 वर्षीय वकील साळवे यांनी हायप्रोफाईल केस कुलभूषण जाधव यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय खटले हाताळले आहेत. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. जाधव यांच्या बाजूनं खटला लढण्यासाठी साळवे यांनी कायदेशीर शुल्कात केवळ 1 रुपयांचं मानधन घेतलं होतं. त्यांच्या या निर्णयाचं देशभरातून कौतुक करण्यात आलं होतं. 

याव्यतिरिक्त टाटा ग्रुप, मुकेश अंबानी यांचा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसी ग्रुप हे त्यांचे काही प्रमुख क्लाइंट्स आहेत. अनिल अंबानींच्या रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस लिमिटेड विरुद्ध कृष्णा गोदावरी बेसिन गॅस विवाद प्रकरणंही हरिश साळवे यांनीच हाताळलं होतं.

हरीश साळवे यांची ख्याती संपूर्ण देशभरात पसरवणारा खटला म्हणजे, सर्वोच्च न्यायालयातील अँटी डंपिंग खटला. 2015 मध्ये, हरीश साळवेंनी 2002 च्या हिट-अँड-रन प्रकरणी अभिनेता सलमान खानकडून खटल्याचं प्रतिनिधीत्व केलं. याप्रकरणी सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. 10 डिसेंबर 2015 रोजी, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर, खानला 2002 च्या हिट-अँड-रन आणि ड्रंक-अँड-ड्राईव्ह प्रकरणातील सर्व आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे.

हरीश साळवे यांनी नोव्हेंबर 1999 ते नोव्हेंबर 2002 पर्यंत भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून काम पाहिलं आहे. त्यांची वेल्स आणि इंग्लंडच्या न्यायालयांसाठी महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. देशातील सर्वात नामांकीत वकिलांपैकी एक असलेल्या साळवे यांनी नागपूर विद्यापीठातून एलएलबी केलं आहे. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी 1992 मध्ये त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group