मुंबई : हास्यकलाकार कुणाल कामराला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या विडंबनात्मक टिप्पणीबद्दल दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठीची याचिका हायकोर्टानं सुनावणीसाठी दाखल करून घेतलीय.
ही याचिका प्रलंबित असेपर्यंत कुणाल कामराला अटक न करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. कुणाल कामराचा जबाब नोंदवायचा असल्यास चेन्नई पोलिसांच्या मदतीनं तिथं जाऊन तो नोंदवण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश देण्यात आलेत.
दरम्यानच्या काळात कामराविरोधात आरोपपत्र दाखल झाल्यास खटला सुरू न करण्याचे आदेश कनिष्ट न्यायालयाला देत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला याप्रकरणी मोठा दणका दिलाय.
न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठानं गेल्या आठवड्यात या याचिकेवरील सुनावणी पूर्ण करीत आपला अंतिम निकाल राखून ठेवला होता.
काय आहे प्रकरण?
कामराने आपल्या एका कार्यक्रमादरम्यान राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीच्या संदर्भात एक भाष्य केले होते. तसेच कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक व्यंगात्मक गाणेही केलं होते. मात्र, व्यंगात्मक गाणे सादर केल्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांनी मुंबईतील खारमधील स्टुडिओची तोडफोड केली होती. तसेच कामराविरोधात राज्यभरात विविध ठिकाणी स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून, हे सर्व गुन्हे मुंबईत खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलेत. हे दाखल गुन्हे रद्द करण्यासाठी कामरानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय.