मुंबई : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हटलं जातं. हिंदू विवाहामध्ये कन्यादान, सप्तपदी यांचा समावेश असतो. दरम्यान, हिंदू विवाहामध्ये कन्यादान करण्याची गरज नसते, मात्र सप्तपदी आवश्यक विधी आहे, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी अलाहाबाद हायकोर्टाने केली आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणावर निकाल देताना म्हटलं आहे की, हिंदू विवाह कायद्याअंतर्गत सप्तपदीची आवश्यकता असते, कन्यादानाची आवश्यकता नसते. अलाहाबाद हायकोर्टाने ही महत्त्वाची टिपण्णी केली आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी दरम्यान सांगितलं की, हिंदू विवाहामध्ये फक्त फक्त सप्तपदी एक महत्त्वाचा विधी आहे, कन्यादान नाही. आशुतोष यादव या याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी आशुतोष यादव यांच्या सासरच्या लोकांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर याप्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र, सत्र न्यायालयाने यादव यांच्या विरोधात निकाल दिला होता. त्यानंतर यादव यांनी सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात पुनर्विचार दाखल केली होती. महत्त्वाचे म्हणजे सत्र न्यायालयात बोलताना त्यांच्या लग्नात कन्यादान आवश्यक असून हा सोहळा पार पडला नाही, असा दावा यादव यांनी केला होता.
दरम्यान, यादव यांच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी कायद्यानुसार ‘सप्तपदी’ हा लग्नादरम्यान एक अत्यावश्यक समारंभ असून ‘कन्यादान’ हा आवश्यक समारंभ नाही, असे न्यायालयाने म्हटले. तसेच यादव यांची पुनर्विचारयाचिका रद्द केली.