नाशिक : नाशिकच्या कुठल्याही धरणातून कोणत्याही परिस्थितीत मराठवाड्यासाठी पाणी सोडू नये अशी मागणी करणारी याचिका नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर सात नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
मराठवाड्यातील नागरिकांना जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो आणि या जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा, नांदूर मधमेश्वर, पालखेड या धरणांमधून पाणीसाठा सोडण्यात येतो पण यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मराठवाड्याला पाणी सोडण्यासंदर्भात सातत्याने प्रयत्न केले जात आहे. असाच एक प्रयत्न आमदार देवयानी फरांदे यांनी दोन दिवसांपूर्वी हाणुन पाडला.
मराठवाड्याला पाणी देण्यासाठी म्हणून गंगापूर आणि दारणा धरणातून पाणीसाठा सोडण्यात यावा अशा स्वरूपाची अधिसूचना पाटबंधारे विभागातने काढली होती. त्यानंतर तातडीने देवयानी फरांदे यांनी हालचाल करून ही सूचना रद्द करावी किंवा स्थगिती मिळावी यासाठी प्रयत्न केले आणि अखेर त्याला स्थगिती देण्यात आली. या याचिकेवर येत्या सात नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालय काय आदेश देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.