बि डी भालेकर शाळा वाचवण्यासाठी १९८६-८७ सालच्या दहावीचे बॅचचे माजी विद्यार्थी एकवटले
बि डी भालेकर शाळा वाचवण्यासाठी १९८६-८७ सालच्या दहावीचे बॅचचे माजी विद्यार्थी एकवटले
img
दैनिक भ्रमर
नाशिक शहरात बिडी भालेकर ही शाळा 1968 सालात नगरपालिका असताना पहिली मराठी माध्यमिक शाळा म्हणून उभी राहिली. बिडी भालेकर या एका हॉकर्स कामगाराने शाळा उभारण्यासाठी आयुष्यभराची कमवलेली जमापुंजी यासाठी लावली होती.

मात्र शाळा बंद असल्याचं कारण देऊन आता नाशिक महापालिका प्रशासनाने शाळेच्या जागी विश्रामगृह उभारण्याचा घाट घातलाय. पालिका प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात आता स्थानिकांकडून कडाडून विरोध दर्शवला जात आहे.मात्र आता याच शाळेत १९८६-८७ साली जे विद्यार्थी शिकले, ते विद्यार्थी देखील आता शाळा वाचवण्यासाठी पुढे सरसावले आहेत.सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत  माळी समाज मंगल कार्यालयात माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी माजी आमदार बोरस्ते सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक आर. टी अहिरे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. 

त्यावेळचे शिक्षक भारती लासुरकर, दिवाकर जोशींसह अन्य दहा शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी त्यांचा शॉल श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. तसेच प्रत्येक विद्यार्थी सद्या काय करत आहे,कुठे आहे याची ओळख करून देण्यात आली.जवळपास ४० वर्षानंतर हे सर्व विद्यार्थी एकत्र येऊन जेव्हा एकमेकांना भेटले, तेव्हा सर्वांचं मन भरून आलं होत.. मैत्रीच्या आठवणींना यावेळी सर्वांनी उजाळा दिला.

सद्या प्रत्येक जण आपल्या नोकरीत किंवा व्यवसायात अडकल्यामुळे आणि बाहेर गावी असल्यामुळे भेटणं शक्य होत नाही.मात्र नाशिक महापालिकेने शाळा पाडण्याच्या संदर्भात जो निर्णय घेतला,त्याला विरोध म्हणून या विद्यार्थ्यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमात सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला.प्रशासनाने शाळा पाडण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला सर्वांनी कडाडून विरोध केला. जोपर्यंत प्रशासन हा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत सर्व माजी विद्यार्थी मिळून विरोध दर्शवत राहु, हा निश्चय यावेळी करण्यात आला. 

बिडी.भालेकर शाळेत शिकणारे विद्यार्थी हे सर्व सामान्य घरातील होते.आजूबाजूची वस्ती देखील सामान्य नागरिकांची आहे.मग ही शाळा जर नसेल तर इथल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं ? सामान्य नागरिकांनी आपली मुल कोणत्या शाळेत शिकवायची हा मोठा प्रश्न आहे.कारण आज आपण बघतोय खाजगी शाळांच्या फी या अवास्तव झाल्या आहेत.मोलमजुरी करणारा माणूस आपल्या मुलाची इतकी अवाढव्य असणारी शाळेची फी भरू शकत नाही.त्यामुळे ही शाळा काढून टाकली तर अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील. त्यामुळे या शाळेच्या जागेवर पुन्हा शाळाच झाली पाहिजे. अशी आग्रही भूमिका सर्वांनी या कार्यक्रमात मांडली.

या कार्यक्रमाचे  सूत्रसंचलन शाळेचे माजी विद्यार्थी अरुण भारस्कर यांनी केलं.. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामदास शिरसाठ (बालाजी कन्स्ट्रक्शन) दत्तू भावले, संतोष बांगर, मोईन शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता प्रीती भोजन करून झाली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group