नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- “तुमच्या मुलीला जर्मनीत चांगल्या पगाराची नोकरी लावून देतो,” असे आमिष दाखवून एका इसमाने एका महिलेला चार लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना जेलरोड येथे घडली.
फिर्यादी भावना जयवंत धोंडगे व आरोपी सचिन गोपीनाथ पेठकर हे दोघेही नाशिकरोड येथील जेलरोड परिसरात असलेल्या श्रीराम सोसायटीत राहतात. फिर्यादी या टेलरिंगचा व्यवसाय करतात. त्यांची मुलगी नोकरीच्या शोधात होती. त्यादरम्यान आरोपी सचिन पेठकर याने फिर्यादी धोंडगे यांच्या मुलीस जर्मनी येथे चांगल्या पगाराची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखविले.
त्यानंतर नोकरीसाठी कागदपत्रे बनविणे व जर्मनीमधील आरोपीच्या परिचितांना पैसे देण्याचे कारण सांगून फिर्यादी महिलेकडून आरोपीने वेळोवेळी 3 लाख 91 हजार 150 रुपये घेतले; मात्र एवढी मोठी रक्कम घेऊनही आरोपी पेठकर याने फिर्यादीच्या मुलीला जर्मनीत नोकरी लावून दिली नाही. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीकडे दिलेले पैसे परत करण्याबाबत तगादा लावला असता आरोपीने फिर्यादी यांना फेडरल बँक शाखा, एर्नाकुलम या बँकेचा दि. 9 एप्रिल 2025 रोजीचा धनादेश दिला.
हा धनादेश फिर्यादी यांनी बँकेत वटविण्याकरिता दिला असता तो धनादेश न वटता परत आला. हा प्रकार फेब्रुवारी 2024 ते दि. 17 एप्रिल 2025 या कालावधीत घडला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादी धोंडगे यांनी आरोपी सचिन पेठकर याच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.