नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- किरकोळ कारणातून एका युवकावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्य दोन तरुणांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की गोपाळ संतोष साखला (रा. तेली गल्ली, देवळाली गाव) हा दि. 21 जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास लालाज् हॉटेलजवळ होता. त्यावेळी फिर्यादीच्या ओळखीचे अमोल अंबादास पठाडे (वय 30, रा. पांडुरंगनगर, विहितगाव) व सुमित बाळू जाधव (वय 25, रा. ड्रीम पार्क सोसायटी, विहितगाव) हे दोघे जण दोन साथीदारांसह तेथे आले. त्यांनी साखला यांना मारहाण करून शिवीगाळ केली, तसेच जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने डोक्यावर वार केला.
या हल्ल्यामुळे फिर्यादी जखमी झाल्यानंतरही “आमच्या नादाला लागलास, तर तुला मारून टाकू,” अशी धमकी दिली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अमोल पठाडे व सुमित जाधव या दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोरपड करीत आहेत.