नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- आर्थिक व्यवहार पूर्ण केलेले असतानाही 1 कोटी 80 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून ती न दिल्यास घरासमोर येऊन आत्महत्या करण्याची धमकी देत इमारतीला आग लावून रहिवाशांना धोका निर्माण केल्याप्रकरणी एका जणाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी रुची हर्षल सुराणा (रा. आशिष बंगलो, जुना आग्रा रोड, नाशिक) या चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांचे पती हर्षल यांचा मित्र आरोपी चेतन गुणवंतराव पाटील (रा. इम्पोरिया हाईट्स, महात्मानगर, नाशिक) याच्याशी असलेले आर्थिक व्यवहार पूर्ण केलेले आहेत. चेतन पाटील यास कोणतेही देणे बाकी नसतानाही दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी पासून पाटील याने राज पवार याच्यामार्फत वेळोवेळी 1 कोटी 80 लाख रुपयांची खंडणीस्वरूपात मागणी केली, तसेच ही रक्कम न दिल्यास फिर्यादी सुराणा यांच्या घरासमोर येऊन आत्महत्या करीन, तसेच पेट्रोल टाकून स्वत:ला व फिर्यादीच्या पतीलाही जाळून जाळून टाकीन, तसेच इमारत पेटवून देईन, अशा वेगवेगळ्या पद्धतीने धमक्या दिल्या.
फिर्यादीच्या पतीने आरोपी चेतन पाटील याची मागणी पूर्ण न केल्याने त्याने दि. 5 जानेवारी रोजी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण होईल, याची जाणीव असतानाही फिर्यादीच्या इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या वाहनांना व इमारतीला आग लावून पेटवून दिले.
यामुळे इमारतीमधील रहिवाशांच्या जिवास धोका निर्माण केल्याप्रकरणी चेतन पाटील याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बैसाने करीत आहे.