लासलगाव : लासलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत विंचूर येथील बसस्थानकाजवळ एमडी ड्रग्ज पेडलरला ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (दि.२०) रात्री सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंदाजे सुमारे सहाशे ग्रॅम ड्रग्ज हस्तगत करण्यात आले असून सोळा लाख रुपये इतके या ड्रग्जचे बाजारमूल्य असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लासलगाव पोलिस ठाण्यांतर्गत विंचूर येथे एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी बसस्थानकाजवळ एक पेडलर्स येणार असल्याची गोपनीय माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या पथकाला मिळाली होती. त्यांनी पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या पथकाची अतिरिक्त मदत घेत उपविभागीय पोलिस अधिकारी हरिश खेडकर, पोलिस उपनिरीक्षक अरुण भिसे, शैलेश पाटील, अंमलदार सुशांत मरकड, प्रमोद मंडलिक, भाऊसाहेब झाडे, कल्पना शिंदे, स्वप्नील माळी आदींच्या संयुक्त पथकाने विंचूर बसस्थानकाजवळ साध्या वेशात सापळा रचला.
याठिकाणी एक संशयित व्यक्ती आला असता पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने याकूब मेमन (५०, रा. विंचूर) असे नाव सांगितले. त्याच्या अंगझडतीमध्ये पोलिसांना एमडी ड्रग्ज पावडर मोठ्या प्रमाणात आढळून आली. पोलिसांनी ड्रग्ज जप्त करत त्यास ताब्यात घेतले आहे. त्याची रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरु होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
ग्रामिण पोलिसांनी मेमन यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने प्राथमिक चौकशीमध्ये ड्रग्ज पावडर दिंडोरी तालुक्यातील एका कंपनीतून आणल्याचे सांगितले. याआधारे रात्री पोलिसांनी एका संशयित कारखान्याची तपासणी केल्याची चर्चा आहे; मात्र त्या कारखान्यात उशिरापर्यंत कुठल्याही प्रकारचे अमली पदार्थ आढळून आले नव्हते, असे सूत्रांनी सांगितले.