लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याचे लिलाव पूर्णतः बंद, शेतकऱ्यांमध्ये नाराजी
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याचे लिलाव पूर्णतः बंद, शेतकऱ्यांमध्ये नाराजी
img
दैनिक भ्रमर
लासलगाव (वार्ताहर): आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) आज कांद्याचे लिलाव पूर्णतः बंद राहिल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. सातत्याने घसरत चाललेले बाजारभाव आणि उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी तातडीने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला असून, ते लवकरच केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

खासदार भगरे यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत कांदा उत्पादकांसह मका उत्पादक शेतकरीही मोठ्या संकटात सापडले असून केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.

कांदा उत्पादकांच्या प्रमुख मागण्या
1. कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपये हमीभाव जाहीर करावा.

2. आतापर्यंत विक्री झालेल्या कांद्यावर प्रति क्विंटल 1,500 रुपये अनुदान द्यावे.

3. कांदा निर्यात वाढवण्यासाठी निर्यात प्रोत्साहन अनुदान 10 टक्क्यांपर्यंत वाढवावे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांदा टिकू शकेल.

मका उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या
1. मका उत्पादक शेतकऱ्यांकडील सर्व मका प्रति क्विंटल 2,400 रुपये हमीभावाने खरेदी करावा.

2. मका खरेदी केंद्रांची संख्या वाढवून शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा द्यावा.

3. सध्या 28 फेब्रुवारीपर्यंत असलेली मका खरेदीची मुदत एप्रिल अखेरपर्यंत वाढवावी, जेणेकरून नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांचा मका खरेदी करता येईल.

खासदार भगरे यांनी केंद्र सरकारच्या आयात–निर्यात धोरणावरही टीका केली. पाकिस्तान आणि चीनसारख्या देशांनी भारतीय कांद्याची परदेशी बाजारपेठ काबीज केल्याने भारताच्या कांदा निर्यातीवर मोठा परिणाम झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भारत–अमेरिका करारामुळे अमेरिकेतून आयात होणाऱ्या शेतीमालावर आयात शुल्क नसल्याने भारतीय शेतकऱ्यांसमोर भविष्यात मोठे संकट उभे राहू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने ठोस तोडगा काढला नाही, तर आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही खासदार भगरे यांनी यावेळी दिला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group