नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- एमएनजीएल गॅसचे बिल भरा असा मॅसेज पाठवून एका शिक्षकाची 5 लाखांची फसवणूक केल्याची घटना मखमलाबाद रोड परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि. 26 मार्च रोजी फिर्यादी अनिल पुंजाराम शेवाळे (वय 56, रा. देवेंद्र हाईट्स, हनुमानवाडी, मखमलाबाद रोड) यांना मोबाईलवर एक कॉल आला. बिल नंबर बी.पी. 25026843 याचे 5 हजार 905 रुपयांचे बिल भरा, असे समोरील व्यक्ती शेवाळे यांना म्हणाला. त्याने शेवाळे यांच्या मोबाईलवर मेसेज करुन एमएनजीएल गॅस बिल अपडेट नावाची लिंक पाठवून ती डाऊनलोड करण्यास सांगितले. शेवाळे यांनी ही लिंक डाऊनलोड करताच त्यांच्या आयडीबिआय बँकेतील खात्यातून 4 लाख 85 हजार 998 रुपये टप्प्या टप्प्याने डेबिट झाले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेवाळे यांनी भाभानगर येथील एमएनजीएल कंपनीविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल पवार करीत आहे.