नाशिक : 77 फिर्यादींना 1 कोटी 70 लाख रुपयांचा मुद्देमाल परत
नाशिक : 77 फिर्यादींना 1 कोटी 70 लाख रुपयांचा मुद्देमाल परत
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :-  शहर पोलीस दलाच्या परिमंडळ-1 कार्यक्षेत्रात गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमालाचा मोठ्या प्रमाणावर परतावा देण्यात आला आहे. 77 फिर्यादींना एकूण 1 कोटी 69 लाख 51 हजार 9 रुपयांचा मुद्देमाल सन्मानाने परत करण्यात आला.



 पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमधील मुद्देमाल तातडीने जप्त करून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो लवकरात लवकर फिर्यादींना परत करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार परिमंडल-1 च्या पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत यांनी संबंधित पोलीस ठाण्यांना मार्गदर्शन केले होते.

 या उपक्रमांतर्गत आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर व मुंबई नाका या पोलीस ठाण्यांनी संयुक्तरीत्या कारवाई करत 448.75 ग्रॅम सोन्याचे दागिने, 152 मोबाईल फोन, 42 दुचाकी, 11 चारचाकी वाहने, एक रिक्षा, दोन लॅपटॉप, एक टॅब तसेच 4 लाख 30 हजार 520 रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल परत केला.   

पोलीसांनी वेळेत तपास करून चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळवून दिल्याबद्दल फिर्यादी, विशेषतः महिलांनी स्त्रीधन परत मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच उपजीविकेसाठी आवश्यक असलेली वाहने परत मिळाल्याने त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचे आभार मानले. दरमहा जास्तीत जास्त मुद्देमाल परत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असे पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत यांनी यावेळी  स्पष्ट केले. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांचे अभिनंदन करण्यात आले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group