नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोपांच्या फ़ैरी एकमेकांवर झाडल्या जात आहेत. विकृत अशोक खरात प्रकरणावरुन सध्या राजकीय वर्तुळात अनेकांचे धाबे दणाणले आहेत. याचदरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी एक्सवर केलेल्या ट्विटमुळे एकच खळबळ उडाली आहे.
क्रूरकर्मा खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे…यही तो नही ‘ताज’ का राज? उबाठाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे. ‘ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल, असं ट्विट शीतल म्हात्रेंनी केलं आहे. शीतल म्हात्रेंच्या या आरोपामुळे शिवसेना ठाकरे गट कोणती प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नाशिकमधील दारणा धरणातून अशोक खरात यांच्या शिवनिका संस्थेसाठी 39 लाख लिटर पाणी मंजूर करण्यात आले होते, ज्याचा जीआर (GR) नुकताच समोर आल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. या संस्थानला पाणी पुरवण्यासाठी धरणापासून 48 किलोमीटर लांब पाईपलाईन टाकण्यात आली होती. हे पाणी पिण्यासाठी आरक्षित दाखवले असले तरी, त्याचा वापर खरातच्या 21 एकरमधील आंब्याच्या बागेसाठी केला जात असल्याचा आरोप आहे. हा प्रस्ताव 25 जून 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंजूर झाला होता. त्यावेळी जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री होते.