अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. SIT अशोक खरातच्या पत्नीला ताब्यात घेण्याच्या तयारीत असतानाच ती फरार झाली त्यामुळे पोलिसांनी खरातच्या मुलाला उचललं. अशोक खरातच्या मुलाने चौकशीत दिलेली कबुली या प्रकरणातील सर्वात मोठा दुवा ठरण्याची शक्यता आहे.
SIT ने अशोक खरातच्या मुलाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. माहितीनुसार, अशोक खरातच्या मुलाने सुरुवातीला मौन बाळगले होते. मात्र प्रश्नांची सरबत्ती झाल्यावर त्याने धक्कादायक माहिती दिली. आमच्या घरात मोठ्या प्रमाणावर कॅश यायची. हे पैसे कुठून आणि कसे येत होते, याबद्दल मला काहीही माहिती नाही. त्याचे सर्व नियंत्रण डॅड अशोक खरात यांच्याकडे होते. त्यांना प्रत्येक व्यवहाराची इत्यंभूत माहिती होती, अशी कबुली अशोक खरातच्या मुलाने दिली आहे. यावरून खरातच्या घरात पैशांचा महापूर वाहत होता आणि त्यामागे मोठे रॅकेट असल्याचे स्पष्ट होत आहे.
मुलाने दिलेल्या माहितीमुळे पोलिसांना आता हवाला रॅकेटचा प्रबळ संशय आहे. भक्तांकडून घेतलेले पैसे आणि इतर संशयास्पद मार्गाने आलेली संपत्ती पांढरी करण्यासाठी खरातने कोणते मार्ग वापरले, याचा शोध घेतला जात आहे. संस्थांच्या नावाखाली चालणारे हे आर्थिक व्यवहार म्हणजे काळा पैसा लपवण्याचे केंद्र होते का? याचा तपास आता सुरू झाला आहे. SIT कडून आता शिवनिका संस्थानचे आर्थिक ऑडिट केले जाणार असून, लवकरच या प्रकरणातील आर्थिक गुन्हेगारीचा मोठा खुलासा होण्याची शक्यता नाशिक पोलीस वर्तुळात वर्तवली जात आहे.