अशोक खरात प्रकरण नाशिकमध्येच नाही तर संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील अशोक खरातची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. महिलांवरील अत्याचार, आर्थिक गैरव्यवहार अशा एक ना एक आरोपांच्या पिंजऱ्यात असलेला अशोक खरात याचा पाय आणखी खोलात जात आहे. महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातवर एका मागोमाग एक गुन्हे दाखल होत आहेत. अनेक पीडित महिला समोर येऊन खरातविरुद्ध गुन्हा नोंदवत असून काहींनी फसवणूक व आर्थिक व्यवहाराबाबतही तक्रारी दिल्या आहेत.
विशेष म्हणजे, अशोक खरात हा सावकारकीचाही धंदा करायचा, त्यामध्ये त्याची पत्नी देखील भागिदार होती. त्यामुळे, त्याच्या पत्नीविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होताच कल्पना खरात पसार झाली आहे. आता, अशोक खरातची फरार पत्नी कल्पना खरात हिच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली. त्यामुळे, कल्पना खरात परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.
शिर्डी पोलिसांकडून कल्पना खरातविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आल्याने आता देशातील सर्वच विमानतळावरुन संबंधित व्यक्तीला विदेशी प्रवासाची बंदी घालण्यात आली आहे. शिर्डीत भोंदू अशोक खरातसह पत्नीवर शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यानंतर खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्या असून शिर्डी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.