दारू पिण्यावरून टोकाचं भांडण, तरुणाने बापाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं
दारू पिण्यावरून टोकाचं भांडण, तरुणाने बापाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं
img
वैष्णवी सांगळे
पुण्यामध्ये एका तरुणाने आपल्या वडिलांना भयंकर मृत्यू दिला. दारु पिण्यावरून वाद झाल्यानंतर तरुणाने आपल्या वडिलांना जिवंत पेटवून दिलं. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाच्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र उद्धव भालेराव (६१, रा. सर्व्हे क्र. १३० दांडेकर पूल) असे मृताचे नाव आहे. त्यांचा खून केल्याच्या आरोपावरून त्यांचा मुलगा सागर (२८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भालेराव सुतारकाम करून आपलं घर चालवक होते. त्यांचा मुलगा सागर हा देखील छोटी मोठी कामे करायचा. दोघांनाही दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत असताना शनिवारी (दि. ७) दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात सागरने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले.

या घटनेत भालेराव गंभीर रीत्या भाजले गेले. आग भडकल्याने सागरने आग आटोक्यात आणून त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. ते पन्नास टक्के भाजले असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. तेथे उपचार सुरू असताना मंगळवारी (दि. ११) मध्यरात्री भालेराव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी सागरला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. घटनेच्या वेळी तोही मद्यधुंद अवस्थेत होता, त्याचवेळी बाप लेकामध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुभाष महाले पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group