धक्कादायक ! मालेगावच्या तरुणाची पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
धक्कादायक ! मालेगावच्या तरुणाची पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
img
वैष्णवी सांगळे
पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पती-पत्नीतील वाद आणि सासरच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केलीय.  आत्महत्येपूर्वी या तरुणाने व्हिडीओ तयार करून तो व्हिडीओ गावाकडील मित्राला पाठवला आणि त्यानंतर संबंधित तरुणाने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. मोहम्‍मद साद आसीफ सय्यद असे आत्‍महत्‍या केलेल्‍या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मोहम्मद साद आसिफ सय्यद (वय 20, सध्या रा. जांभूळवाडी, मूळ रा. नयापुरा, मालेगाव, जि. नाशिक) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी करीमुन्निशा ऊर्फ निशाखान (वय 20, रा. सप्तगिरी सोसायटी, जांभूळवाडी), सर्वर ऊर्फ कैफ कमरू खान (वय 22, रा. संतोषनगर, कात्रज), रेश्मा कमरूखान (वय 50), शमा जावेद शेख, जावेद शेख (वय 25), अथर्व काळे आणि इशीता यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद साद हा मूळचा मालेगाव येथील रहिवासी असून, त्याचा एक वर्षापूर्वी पुण्यातील एका तरुणीसोबत मुस्लिम पद्धतीने विवाह झाला होता. लग्नानंतर तो जांभूळवाडी परिसरात राहत होता आणि रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, किरकोळ कारणांवरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. तसेच, सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. हा त्रास सहन न झाल्याने मोहम्मद साद याने आपल्या मोबाईलवर आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ तयार केला. त्या व्हिडिओत त्याने सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.

नंतर हा व्हिडीओ त्याने आपल्या गावाकडील एका मित्राला पाठविला. दि. 7 मार्च रोजी कात्रज येथील संतोषनगर परिसरातील डिलाईट बेकरीसमोर रिक्षा उभी करून त्याने उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, त्या मित्राने हा व्हिडीओ मोहम्मद सादच्या कुटुंबीयांना दाखविल्याचे तक्रारीत म्हटले. त्यानंतर त्याची आई नौशा दतन्वीर अहमद (वय 41, रा. नयापुरा, मालेगाव, जि. नाशिक) यांनी आंबेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आंबेगाव पोलिस ठाण्यातील पीएसआय मारुती वाघमारे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group