दिल्लीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दिल्लीच्या एनआयए परिसरातील खेडा गावात बंद कारमध्ये दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. याबाबत पोलिसांना माहित मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कारचे दरवाजे उघडले तर पोलिसांनाही धक्का बसला. कारमध्ये दारूच्या बाटल्या आणि दोघांचे मृतदेह आढळले. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.
पोलिसांना दोन्ही मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आले आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले की दोन्ही मृत्यू झालेल्या व्यक्ती एकाच खेडा खुर्द गावातील रहिवासी होते. विकास (४२ वर्षे) आणि विजेंद्र (३६ वर्षे) अशी मृतांची नावं होती. दोघांचा मृत्यू नेमका कसा झाला? ही हत्या आहे की आत्महत्या? तसंच त्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावण्यात आले.
फॉरेन्सिक टीमने संपूर्ण परिसरातून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आणि कार आणि आजूबाजूच्या परिसराची बारकाईने तपासणी केली. दोघांचा मृत्यू कसा झाला याचा तपास पोलिस करत आहेत.प्राथमिक माहितीनुसार मृतदेहांजवळ कोणतीही असामान्य परिस्थिती आढळली नाही. परंतू सर्व पैलू विचारात घेऊन या प्रकरणाचा तपास केला जात आहे. पोलिसांनी परिसरातील रहिवाशांना अफवांकडे दुर्लक्ष करून तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले.
पोलिसांनी सांगितले की, कारमध्ये तीन दारूच्या बाटल्या होत्या. त्यामधील एक दारूची बाटली उघडण्यात आली होती तर दोन सील बंद होत्या. कारच्या सर्व काचा बंद करण्यात आल्या होत्या. मृतदेहांवर जखमा आढळून आल्या नाहीत. पण कारच्या आतमधून दुर्गंधी येत होती. याचाच अर्थ हे मृतदेह बऱ्याच काळापासून कारमध्ये होते. त्यामुळे ते कुजण्यास सुरूवात झाली होती. कदाचित या दोघांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर सत्य समोर येईल.