दिल्ली विमानतळावर एक मोठा विमान अपघात घडला आहे. दोन विमानांच्या पंखांची टक्कर झाली आहे. या धडकेनंतर सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून विमानांची उड्डाणे थांबवण्यात आली. स्पाईसजेट आणि अकासा एअरच्या विमानांच्या पंखांची ही टक्कर झाली. अकासा एअरचे विमान दिल्लीहून हैदराबादला जात होते.
माहितीनुसार, नवी दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुपारच्या सुमारास ही घटना घडली. अकासा एअरचे VT-YBA विमान हैदराबादकडे जाण्यासाठी पुशबॅक घेत होते. तर लेहमधून आलेले स्पाइसजेटचे VT-SLB विमान गेटकडे जात होतं. याच दरम्यान दोन्ही विमानांची धडक झाली. दोन्ही विमानांची पाते एकमेकांना घासली, यामध्ये स्पाईस जेटच्या विमानाचं नुकसान झालं आहे. सुदैवाने दोन्ही विमानाचा वेग कमी होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
घटनेची माहिती मिळताच विमानतळ प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अकासा आणि स्पाईसजेट विमानातील प्रवाशांना सुखरुपपणे उतरवण्यात आलं आहे. स्पाइसजेटचं बोईंग 737-700 विमान टॅक्सिंग करत असताना अकासा एअरच्या विमानाला धडकलं. या अपघातात स्पाइसजेटच्या विमानाच्या उजव्या विंगलेटचं मोठं नुकसान झालं, तर अकासा एअरच्या विमानाच्या डाव्या हॉरिझॉन्टल स्टेबलायझरलाही धक्का बसला.
या घटनेनंतर दोन्ही विमानांना सध्या ग्राउंड करण्यात आलं आहे. सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानाने पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार, धडक झाल्यावेळी अकासा एअरचे विमान उभं होतं, त्यामुळे नेमकी चूक कुणाची हे तपासात स्पष्ट होणार आहे.