नागरिकांनो सावधान!  चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा भीषण स्फोट; संपूर्ण कुटुंब होरपळलं
नागरिकांनो सावधान! चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा भीषण स्फोट; संपूर्ण कुटुंब होरपळलं
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून मोबाईलचा स्फोट झाल्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. अशातच उत्तर प्रदेशमध्ये होळीच्या पूर्वसंध्येला घडलेली एक मन सुन्न करणारी घटना घडलीय. येथे मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे एक, दोन नाहीतर तब्बल 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी चार मुलांचा मृत्यू झाला असून पालकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय. 

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील एका घरात ही दुर्दैवी दुर्घटना घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील चार मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी पल्लवपुरम पोलीस स्टेशन हद्दीतील जनता कॉलनीत रात्री उशिरा ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटना ज्या खोलीत घडली, तिथे एक इलेक्ट्रिकल बोर्ड होता आणि मोबाईल चार्जिंगला होता. अचानक इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या बाहेर आल्या. यानंतर ठिणगी पडल्यानं बेडवरील फोमच्या गादीनं पेट घेतला आणि आग लागली. पाहता पाहता आग संपूर्ण खोलीत पसरली. काही मिनिटांतच संपूर्ण खोली आगीच्या भक्ष्यस्थानी आली. 

नेमकं काय घडलं? 
खोलीत आग लागली त्यावेळी संपूर्ण कुटुंब होतं. पती-पत्नी आणि त्यांची मुलं असे सहाजण खोलीत होते. पती-पत्नीनं आपल्या मुलांसह जीव वाचवण्याचा अतोनात प्रयत्न केला. पण त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. आग संपूर्ण खोलीत पसरली होती. घरातील सर्वचजण होरपळून निघाले. 

आगीची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी धाव घेत, घरातील सर्वांना बाहेर काढलं. त्यांना तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून त्यांना मेरठच्या, लाला लजपतराय मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं.  

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील रहिवाशी असलेल्या जॉनीचं संपूर्ण कुटुंब जनता कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होतं. जॉनी हा रोजंदारीवर काम करतो. होळीच्या सुट्टीमुळे जॉनी शनिवारी घरीच होता आणि त्याची पत्नी बबिता स्वयंपाक करत होती. खोलीत त्याची मुलगी सारिका (10), निहारिक (8), मुलगा गोलू (6) आणि मुलगा कालू (5) खेळत होते. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान निहारिक आणि कालू या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील इतर सदस्यांवर उपचार सुरू होते. त्यानंतर पहाटे आगीत होरपळून निघालेल्या इतर दोन मुलांनीही आपला जीव सोडला. तर मुलांचे आई-वडीलांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group