उत्तर प्रदेशमधील अलीगढमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत येत असताना झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ४ जणांचा जळून मृत्यू झालाय. अलीगढमध्ये राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यामुळे दोन्ही गाड्यामध्ये भीषण आग लागली. अपघातात चार जणांचा जळून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत चिमुकल्याचाही मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अकराबाद येथील नानऊ पूलाच्या जवळ ही दुर्दैवी घटना घडली. दोन्ही गाड्या अतिशय वेगात होत्या. अलीगढपासून २० कमीवर अकराबाद येथे कार अन् ट्रकचा अपघात झाला. गाड्या इतक्या वेगात धडकल्या की तेलाचा टँक फुटला अन् आग लागली. डिझेलमुळे आग वेगात पसरली अन् क्षणात गाडी आगीत जळून खाक झाली. आतमधील चार जणही जळून खाक झाले. मृत्यू झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील होते.
कारमधील सर्वजण मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत येत होते. त्यावेळी काळाने घाला घातला. मृतामध्ये महिला अन् मुलांचाही समावेश आहे. चारही जणांचे मृतदेह जळून खाक झाले आहेत, त्यामुळे ओळख पटवता आली नाही. प्राथमिक माहितीनुसार, मृतामध्ये एक महिला, एक पुरूष आणि दोन चिमुकल्यांच समावेश आहे. या दुर्देवी अपघातामध्ये एकजण गंभीर भाजला गेला आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.