कर्तव्यावर असतानाच पोलिसावर काळाने घाला घातला, भरधाव वाहनाची जोरदार धडक अन क्षणात होत्याचं नव्हतं झालं
कर्तव्यावर असतानाच पोलिसावर काळाने घाला घातला, भरधाव वाहनाची जोरदार धडक अन क्षणात होत्याचं नव्हतं झालं
img
वैष्णवी सांगळे
सहकाऱ्यांसोबत पेट्रोलिंगवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा भीषण अपघातात मृत्यू झालाय. ही घटना गुरुवारी रात्री कर्जत तालुक्यातील राशीन परिसरात घडली. पोलीस दलातील एक तरुण, कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदार सुदाम राजकुमार पोकळे (वय 29) यांचा रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाला. एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली आणि चालक वाहनासह पसार झाला.

अंमलदार सुदाम पोकळे हे मूळचे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील चिंचाळा गावचे रहिवासी होते. सध्या ते अहिल्यानगर पोलीस दलात कार्यरत असून कर्जत पोलीस ठाण्यातर्गत असलेल्या राशीन पोलीस चौकीत त्यांची नियुक्ती होती. गुरुवारी रात्री सुदाम पोकळे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत नेहमीप्रमाणे गस्तीवर (पेट्रोलिंग) होते. गस्त घालत असताना एका भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात घडल्यानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलीस सध्या या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा कसून शोध घेत आहेत. सुदाम पोकळे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानं पोकळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group