पिसळलेल्या नागीनिनीने थयथयाट केला
नाचगाण्यासाठी सारा गाव येडा झाला
त्यांनी लाज भीड नीती सारी सोडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
हे बोल पिंजरा या चित्रपटातील. तुम्हाला पिंजरा हा मराठी चित्रपट आठवतोय. उत्कृष्ट लेखन , दिग्दर्शन आणि अभिनय देखील तितकाच उत्कृष्ट. तमाशात काम करणाऱ्या महिलेचा एका गावातील पुरुषावर कसा परिणाम झाला , तो जिवंत असूनही कसा मृत होता अशा अनेक घटनांचे सुंदर सादरीकरण चित्रपटात दिसते. आता तुम्हाला हे सर्व सांगण्यामागचं कारण हेच की बीडमधील माजी उपसरपंचाची आत्महत्या. आत्महत्या अगदीच काही चित्रपटाला मिळतीजुळती नसली तरी अनेक साम्य दर्शवते.
बीडमधील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांची कहाणी काहीशी चित्रपटाशी मिळतीजुळती. एका २१ वर्षीय नर्तिकेशी सुरु असलेल्या प्रेमप्रकरणातून आयुष्याचा त्यांनी शेवट केला. काल बार्शी तालुक्यात त्यांचा मृतदेह सापडला.
बीडमधील गेवराई तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने मंगळवारी डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ते कला केंद्रातील पूजा गायकवाड या नर्तिकेच्या प्रेमात वेडे झाले होते. पूजा गायकवाड ही कला केंद्रात नर्तिका असून ती 21 वर्षांची आहे. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांची ओळख झाली होती. कालांतराने पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाले. पूजा गायकवाड ही इन्स्टाग्रामवर तिच्या नाचण्याचे अनेक रिल्स शेअर करायची.
गोविंद बर्गे यांनी प्रेमप्रकरण सुरु असताना पूजा गायकवाड हिला पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने दिले होते. गेल्या काही दिवसांपासून पूजा गायकवाड ही गोविंद बर्गे यांच्याशी बोलत नव्हती. त्यामुळे गोविंद बर्गे नैराश्यात होते. पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्याकडे गेवराईतील बंगला आपल्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर जमीन करा, अशी मागणी केली होती. गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने पूजा गायकवाड हिच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे.
सोमवारी रात्री ते पूजाच्या घरी गेले होते. मात्र, त्याठिकाणी अपेक्षित गोष्टी न घडल्याने गोविंद बर्गे यांनी याच नर्तिकेच्या घरासमोर कारमध्ये स्वत:च्या कानशिलात गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.