प्रजासत्ताक दिनी बीड येथे एक आगळंवेगळंच प्रकार बघायला मिळाला. 'बायको नांदत नाही,पोलिसांनी माझा संसार बसवून द्यावा, अशी मागणी करत नितीन उबाळे या तरुणाने थेट बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन समितीच्या इमारतीवर चढून आत्महत्येचा इशारा दिला. या प्रकाराने पोलिसांची आणि प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
नितीन उबाळे या तरुणाने आतापर्यंत पाच वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. आता या तरुणाने सहाव्यांदा टोकाचे पाऊल उचलत आंदोलन सुरू केल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, नितीनला समजावून सांगण्याचे आणि सुरक्षितपणे खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि समुपदेशकही त्याच्याशी संवाद साधत असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.