बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात एक चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. कमी दिवसात, कमी वजनाचे जन्मलेले बाळ हालचाल करत नसल्याचे पाहून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करून नातेवाइकांकडे सुपूर्द केले. त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच ते बाळ हालचाल करत रडू लागले.
केज तालुक्यातील होळ येथील रहिवासी घुगे कुटुंबाच्या नवजात बाळाला मृत घोषित केल्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच, बाळ अचानक रडू लागल्याने नातेवाईकांनाही मोठा धक्का बसला. हा प्रकार मंगळवारी उघडकीस आला.
महिलेला प्रसुतीसाठी स्वामी रामानंद वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रसुतीनंतर डॉक्टरांनी बाळ मरण पावल्याचं सांगितलं. कुटुंबीय बाळाला आपल्या गावी घेऊन गेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र, या तयारीदरम्यान बाळाने अचानक रडायला सुरुवात केली. हा प्रकार पाहून नातेवाईक आश्चर्यचकित झाले.
असं घडल्यानंतर त्यांनी तत्काळ परत अंबाजोगाई येथील रुग्णालय गाठलं आणि बाळाला तातडीने अति दक्षता कक्षात दाखल केलं. ही घटना घडल्यानंतर रुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं बाळ जिवंत निघणं, ही बाब केवळ धक्कादायक नसून संतापजनकही आहे अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
हा अक्षम्य दुर्लक्षाचा प्रकार असून उपचार प्रक्रियेत काही चूक झाली होती, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. विशेष म्हणजे, बाळाच्या कुटुंबीयांनी अद्याप रुग्णालय प्रशासनाकडं कुठलीही तक्रार दाखल केलेली नाही.
या घटनेनंतर रुग्णालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नवजात बाळांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.