बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण प्रचंड गाजलं आहे. कारण या घटने मागे वाल्मिक कराड कनेक्शन असल्याची माहिती मिळाली आहे. अशातच आज या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र या प्रकरणातील सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे नेमके कोण आहेत? तसेच त्यांच्यावर आतापर्यंत कोणते गुन्हे दाखल आहेत? यासंदर्भात माहिती मिळाली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला पोलिसांनी अटक केली आहे. तर सिद्धार्थ सोनवणेला देखील मुंबईतून ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच सरपंच संतोष देशमुख यांचं लोकेशन देणारा आणखी डॉक्टरला देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यामुळे आता या सर्वांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचं वय हे 26 वर्ष आहे. सुदर्शन घुलेवर मागील 10 वर्षांत तब्बल 10 गुन्हे दाखल झाले आहेत.
यामध्ये मारहाण, अपहरण, चोरी, खंडणी आणि खुनाचा प्रयत्न तसेच फूस लावून पळवून नेल्याचे गुन्हे दाखल आहेत. अशातच आता सरपंच हत्या प्रकरणी देखील त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दुसरा आरोपी सुधीर सांगळे हा आहे. सुधीर सांगळेच वय हे 22 वर्ष आहे. तसेच आता आरोपी सांगळेवर खुनातील सहभागाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कारण आवादा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.