पवन पवारच्या अडचणीत आढ; वृद्धेला जिवे मारण्याची धमकी देऊन उकळली २० लाखांची खंडणी
पवन पवारच्या अडचणीत आढ; वृद्धेला जिवे मारण्याची धमकी देऊन उकळली २० लाखांची खंडणी
img
दैनिक भ्रमर


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- वृद्धेच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्याकडून २० लाख रुपयांची खंडणी उकळणार्‍या पवन पवारसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही नवीन सिडकोमध्ये भुजबळ फार्म परिसरात राहते. एप्रिल २०२३ ते दि. १ मार्च २०२४ दरम्यान आरोपी पवन पवार, त्याचा भाऊ विशाल पवार (दोघेही रा. जेलरोड, नाशिकरोड) व कल्पेश किरवे (रा. विठ्ठल मंदिराजवळ, जेलरोड) या तिघांनी भुजबळ फार्म परिसरातील मघा सेक्टरमध्ये राहणार्‍या फिर्यादी यांच्या घरी येऊन चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली.

तसेच आरोपींकडील काळ्या रंगाच्या काळ्या काचा असलेल्या गाडीत जबरदस्तीने बसवून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या नमूद मिळकती व फिर्यादीच्या पतीच्या नावे असलेल्या इतर मिळकती अशा सर्व मिळकतींसंदर्भात विशाल पवार याच्या नावाने तयार केलेल्या नोटरी व रजिस्टर जनरल मुखत्यारपत्रावर सह्या घेऊन फिर्यादीच्या सेंट्रल बँकेच्या अंबड शाखेतील खात्यावर २० लाख रुपये टाकले व ते काढून घेण्यासाठी फिर्यादीला पुन्हा जबरदस्तीने गाडीत बसवून बँकेत घेऊन गेले.

फिर्यादीकडून ते पैसे काढून घेतले. पवन पवार हा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती असल्याने व त्याची दहशत असल्याने, तसेच फिर्यादीला कोणाचा आधार नसल्याने जिवाच्या भीतीपोटी त्यांनी पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत तक्रार दिली नव्हती; मात्र फिर्यादीला आजूबाजूच्या लोकांनी तक्रार देण्यासाठी धीर दिला. त्यामुळे पवन पवार, विशाल पवार व कल्पेश किरवे यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन खैरनार करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group