नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक महानगरपाालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन हजार कोटी रूपयांची कामे सुरू केली आहेत. त्याच प्रमाणे आगामी आर्थिक वर्षात राज्य आणि केंद्र शासनाकडून सुमारे पाचशे कोटी रूपयांचा निधी मिळण्याची अपेक्षा असल्याची माहिती नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना उशिर होत असल्याचे सांगितले जात असले तरी मनपा प्रशासनाने मात्र वेळेपूर्वीच निविदा मागवल्या असून कामांना प्रारंभ केला आहे. साडेबाराशे कोटी रूपयांची रस्ता कामे सुरू करण्यात आली आहेत. आधी युटीलीटी लाईन्स टाकल्यानंतर रस्त्याचे पुढील वर्षी काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. गोदावरी शुध्दीकरणाचा सुमारे दीड हजार कोटी रूपयांचा प्रकल्प सुरू असून आत्तापर्यंत 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. या शिवाय महापालिकेच्यावतीने चारशे कोटी रूपयांची मुकणे पाणी पुरवठा योजना, 40 कोटी रूपयांची पाणी पुरवठा योजना, 225 कोटी रूपयांची गटार योजना अशी अनेक कामे सुरू असून या कामांची एकूण किंमत सुमारे तीन हजार कोटी रूपये इतकी आहे.
नाशिक महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या वेळेत सर्व कामे पूर्ण होतील, असे सांगून त्यांनी सांगितले की, आगामी आर्थिक वर्षात केंद्र शासनाकडून हरीत बॉण्ड्स संदर्भात इन्सेंटीव्ह आणि अन्य रक्कम असे किमान पाचशे कोटी रूपयांपर्यंतचा निधी मिळेल. मात्र, दुसरीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आराखड्यातील 25 टक्के हिस्सा नाशिक महानगरपालिकेचा आहे, तो द्यावा लागेल. तसेच बॉडसाठी देखील निधी बाजूला काढून ठेवावा लागणार आहे. त्यामुळे खर्च देखील असणार आहे. त्याच प्रमाणे सध्या ही सर्व भांडवलीच कामे असल्याचे त्या म्हणाल्या.
पुढील आठवड्यात अर्थसंकल्प मांडणार
नाशिक महानगरपालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली असली तरी अद्याप स्थायी समिती गठीत नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात स्थायी समितीची निवडणूक शक्य आहे. त्यामुळे त्या महिनाअखेरीस आर्थिक वर्ष 2026-27 चे आर्थिक अंदाजपत्रक मांडण्यात येणार आहे.