महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या सुरुवातीला वातावरणात मोठे बदल दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावासाने हजेरी लावली असून मुंबई, ठाणे, पुणे शहरात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. या आठवड्यासाठी राज्यातील काही जिल्ह्यांना IMD कडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आज दिवसभरात कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रातून कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर ओसरला असून अरबी समुद्राकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. याचाच अर्थ, गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी हुडहुडी आता कमी झाली असून रात्रीचा गारवा उबदारपणात बदलत आहे. मात्र काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये धो-धो पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कुठे होऊ शकतो पाऊस?
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, उत्तर भारतात सक्रिय असलेल्या वेस्टर्न डिस्टरबन्सचा प्रभाव महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांवर जाणवू शकतो. उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या हलक्या पावसाच्या सरी किंवा मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्यांतही ढगाळ वातावरण राहून पावसाचा शिडकावा होऊ शकतो.
धुळे, जळगाव, नाशिक, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाने पाऊस होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता अधिक आहे.