नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने मालमत्ता कर थकविणार्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अभय’ आणि ‘सवलत’ योजना राबवूनही कर न भरणार्या मालमत्ताधारकांवर आता थेट कारवाई होणार असून सुमारे 700 मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांवर बोजा चढवण्याची तयारी मनपाने सुरू केली आहे.
मोठ्या थकबाकीदारांवर विशेष मोहीम राबवत 1 हजार 453 जणांना वॉरंट बजावण्यात आले होते. त्यापैकी 766 जणांनी सहकार्य करत 13 कोटी रुपये भरले. मात्र, 687 जणांनी अजूनही त्याला प्रतिसाद दिलेला नाही. या थकबाकीदारांकडे तब्बल 25 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. महापालिकेच्या कर संकलन विभागाने मागील आर्थिक वर्षात एकूण 284 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला. एप्रिल ते जून दरम्यान राबविण्यात आलेल्या सवलत योजनेतून 93 कोटींची वसुली झाली, तर ‘अभय’ योजनेच्या दोन टप्प्यांतून सुमारे 100 कोटी रुपये जमा झाले. या पार्श्वभूमीवर मनपाने आता कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.
संबंधित थकबाकीदारांच्या मालमत्तांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून, लवकरच त्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांच्या मालमत्तांचा दोन वेळा लिलाव करण्यात येईल. लिलावाला प्रतिसाद न मिळाल्यास त्या मालमत्तांवर मनपाकडून थेट बोजा चढवला जाणार आहे. पुढील महिन्याभरात ही कारवाई वेगाने राबवली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. वर्षभर विविध सवलती देऊनही कर न भरणार्या 687 थकबाकीदारांच्या सातबार्यावर मनपाचे नाव नोंदवले जाणार आहे. त्यामुळे संबंधित मालमत्तांवर मालकांचा हक्क मर्यादित होणार असून व्यवहार करताना अडचणी निर्माण होऊ शकतात, असे नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त अजित निकत यांना सांगितले.
विभागनिहाय थकबाकीदार
सातपूर : 68
सिडको : 96
नाशिक पूर्व म : 86
पंचवटी : 105
नवीन नाशिक : 108
नाशिक रोड : 224