राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाला पोषक वातावरण कायम आहे. राज्यातील अनेक भागात आज पावसाची शक्यता आहे. तर पुढील ३ दिवसांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मंगळवारी एक नवीन पश्चिमी विक्षोभ (वादळ) सक्रिय होणार असून यामुळे देशाच्या उत्तरेच्या राज्यांमध्ये पुन्हा जोरदार वादळी पाऊस, गारपीट आणि बर्फबवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
महाराष्ट्रात सध्या पावसाळी हवामानाचा प्रभाव कमी होत असून पुढील काही दिवसात उष्णता वाढीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र, पुन्हा ७ ते ९ एप्रिल दरम्यान देशातील अनेक भागात वादळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे हवामानात बदल होऊ शकतात असा अंदाज हवामान अभ्यासक व्यक्त करत आहेत.
आज वर्धा, नागपूर, गोंदीया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. तर नांदेड, हिंगोली, नाशिक, नंदूरबार, धुळे, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात उद्या आण बुधवारी वादळी पावसाचा अंदाज आहे. तर गुरुवारी सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज आहे.