२ मे २०२६
पुणे जिल्ह्यातील नसरापूर परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत निर्घृण घटना समोर आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आजोळी आलेल्या एका ४ वर्षांच्या चिमुकलीवर सराईत गुन्हेगाराने अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण नरसापूर गावात संतापाची लाट उसळली असून, नराधमाला आमच्यासमोर फाशी द्या, अशी मागणी करत संतप्त ग्रामस्थांनी गाव कडकडीत बंद ठेवले आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या नरसापूर परिसरात चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आज नरसापूर गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला असून, नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो यापूर्वी दोन वेळा कारावास भोगून आला आहे. सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी तो जेलमधून सुटून आल्याचेही सांगितले जाते.
यापूर्वी ७५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच स्वतःच्या पुतणीवर अत्याचार केल्याचा आरोपही त्याच्यावर यापूर्वी नोंदवण्यात आला असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, नसरापूर गावातील महिला चिमुकलीवर झालेल्या अत्याचारामुळे संतापल्या असून, आमच्या समोर नराधमाला फाशीची शिक्षा द्या. आमची सुरक्षा करता येत नसेल तर तर लाडकी बहीण म्हणून काय उपयोग काय? असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून, संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
वासरू दाखवण्याच्या बहाण्याने चिमुकलीला नेलं गोठ्यात
उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे चिमुकली आजोळी आली होती. यावेळी तिला नराधम आरोपीने वासरू दाखवतो म्हणून हात धरून गोठ्यात नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या करत मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला. दुपारी चिमुकली दिसत नसल्याने तिची शोधाशोध केली असता चिमुकली गोठ्यात मृत अवस्थेत आढळली. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना दिसला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
आरोपीच्या कठोर शिक्षेची मागणी
आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आलेल्या या मुलीच्या कुटुंबियांनी आपल्याच मुलीसोबत असं काही घडेल असा विचारही केला नव्हता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज बघितले आणि अख्ख कुटुंब हादरले. या घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत पोलिसांना घेराव घातला. रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढली, त्यानंतर गावकऱ्यांनी मोर्चा मागे घेतला. यानंतर आज सकाळी देखील गावकऱ्यांनी काळ्या फिती बांधत या घटनेचा निषेध करत मोर्चा काढला.
Copyright ©2026 Bhramar