२ मे २०२६
आज सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी देशभरातील कोट्यवधी मोबाईल फोन एकाच वेळी कर्कश आवाजात वाजू लागले. खिशातले आणि हातातले फोन तीव्र व्हायब्रेशनसह ओरडू लागल्याने "देशावर काही युद्धप्रसंग ओढवला की काय?" अशी भीती नागरिकांमध्ये पसरली. मात्र, हा कोणताही धोका नसून केंद्र सरकारची एक 'मोठी तयारी' होती. नक्की काय घडलं आणि सरकारची ही 'डिजिटल ढाल' काय आहे? पाहा सविस्तर...
ऑफिसमध्ये कामात मग्न असलेले कर्मचारी असोत, बाजारात खरेदीसाठी गेलेले ग्राहक असोत किंवा रस्त्यावरून वाहन चालवणारे चालक सर्वांचे मोबाईल फोन अचानक एकाच वेळी तीव्र आवाजात वाजू लागले. एखाद्या मोठ्या संकटाची सूचना देणारा तो कर्कश अलार्म आणि त्यासोबत होणारे तीव्र व्हायब्रेशन पाहून काही क्षणांसाठी संपूर्ण भारत स्तब्ध झाला. ‘भारतावर काही मोठं संकट तर आलं नाही ना?’ अशी भीती प्रत्येकाच्या मनात दाटून आली होती. सकाळी ११.४० च्या सुमारास सर्व भारतीयांच्या मोबाईल स्क्रीनवर एक पॉप-अप झाला.
अनेक ठिकाणी लोकांनी घाबरून एकमेकांना फोन करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर अवघ्या काही मिनिटांत ‘Mobile Alarm’ ट्रेंड होऊ लागला. विशेषतः रशिया-युक्रेन आणि इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांना वाटले की हा एखादा सायबर हल्ला आहे किंवा युद्धाची पूर्वसूचना. मात्र, थोड्याच वेळात चित्र स्पष्ट झाले आणि प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला.
हा कोणताही धोक्याचा इशारा नसून केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागातर्फे करण्यात आलेली ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम’ची (CBAS) एक चाचणी होती. नैसर्गिक आपत्ती जसे की पूर, भूकंप किंवा चक्रीवादळ यासारख्या आणीबाणीच्या काळात नागरिकांना एकाच वेळी सतर्क करण्यासाठी हे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या चाचणीचा मुख्य उद्देश यंत्रणेच्या कार्यक्षमतेची तपासणी करणे हा होता. सुरुवातीला हा मेसेज इंग्रजी आणि दाक्षिणात्य भाषांमध्ये आल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
मात्र, काही वेळानंतर महाराष्ट्रातील नागरिकांना मराठी भाषेतही हा संदेश प्राप्त झाला. “हा एक चाचणी संदेश आहे, कृपया याकडे दुर्लक्ष करा,” अशा आशयाचा तो मजकूर होता. सरकारचा ‘सतर्क नागरिक, सुरक्षित राष्ट्र’ हा उद्देश या प्रणालीमागे आहे. अशा प्रकारची यंत्रणा सध्या अमेरिका, यूएई आणि इस्रायल यांसारख्या देशांमध्ये कार्यान्वित आहे.
दुबईमध्ये रॉकेट हल्ल्याच्या वेळी ‘नॅशनल वॉर्निंग सिस्टम’द्वारे नागरिकांना अशाच प्रकारे सतर्क केले जाते. भारतानेही आता हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले असून, यामुळे भविष्यात मोठी जीवितहानी टाळण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, नागरिकांनी अशा मेसेजमुळे घाबरून जाऊ नये. ही यंत्रणा केवळ तुमच्या सुरक्षेसाठी आहे. भविष्यात कोणत्याही मोठ्या संकटाची माहिती प्रशासनाकडून थेट तुमच्या हातातील मोबाईलपर्यंत पोहोचवण्यासाठी ही ‘डिजिटल ढाल’ तयार करण्यात आली आहे.
Copyright ©2026 Bhramar