राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. सरकारने बँकांना थेट आदेश देत शेतकऱ्यांची थकीत कर्ज प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, शेतकरी कर्जमाफी योजनेची तयारी अंतिम टप्प्यात असून 30 जूनपूर्वी कर्जमाफीची अंमलबजावणी केली जाईल. राज्य मंत्रिमंडळात यासंदर्भात चर्चा पूर्ण झाली असून काही जिल्ह्यांची माहिती येणे बाकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या घोषणेनंतर आता या कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी नेमकी कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आता खरीप हंगाम जवळ आला आहे. हंगाम सुरू होण्याआधी लवकर ही कर्जमाफी अंमलात आली पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती, त्यानंतर हा निर्णय घेणयात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांना दिले जाणारे क्रॉप लोन, शेतकऱ्यांची कर्जमाफी, खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियांणांची, खतांची उपलब्धता तसेच यावेळी पावसाचा अंदाज या सर्व महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत काही निर्णयही घेण्यात आले. याबाबत फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली.
कर्जमाफीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही बँकांशी कर्जमाफीच्या बाबतीत चर्चा केली आहे. आपल्याला कर्जमाफी करायची आहे. बँकांनी कर्जमाफीची माहिती कोणत्या फॉरमॅटमध्ये द्यायची, कर्जमाफी कोणत्या फॉरमॅटमध्ये करायची, अशी एक चर्चा झाली आहे. आम्ही कर्जमाफीचा जो निर्णय घेतलेला आहे, तो वेळेत कसा पूर्ण करता येईल त्याचंही नियोजन करण्यात आलं आहे. यावर्षी जास्त शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होणार आहेत.
राष्ट्रीयकृत बँकांना अतिशय कडक शब्दांत सांगितलं आहे की, शेतकऱ्यांना कोणत्याही सिबीलची मागणी करू नये. बँकांच्या मुख्यालयांनी प्रत्येक शाखेला याबाबत पत्र पाठवले पाहिजे. या पत्रात क्रॉप लोनसाठी सिबीलची अट नाही. आमच्या बैठकीत आरबीआयचे अधिकारी होते. त्यांनीही याबाबत पुष्टी केलेली आहे. कुठल्याही क्रॉपलोनसाठी कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही, असा आदेश देण्यात आलेला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.