संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. मुख्य आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून आता त्याची रवानगी येरवडा कारागृहात येथे करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपीची पोलीस कोठडीची मुदत संपली आहे. यानंतर गुरुवारी त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी आता येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
गुन्ह्यातील तांत्रिक बाबींचा तपास अजून सुरू असून, साक्षीदारांकडे तपास करणे बाकी आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारी पक्ष आणि विशेष सरकारी वकील ॲड. अरुंधती ब्रह्म यांनी आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली होती. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीची रवानगी य़ेरवडा कारागृहात करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विजयमाला पवार करत आहेत. त्यांनी न्यायालयात माहिती दिली की, आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. पंचनामे, साक्ष नोंदवणे आणि तांत्रिक पुराव्यांचे संकलन ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर मुदतीत लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल केले जाईल.
नसरापूर येथे एका 65 वर्षीय नराधमाने घरासमोर खेळणाऱ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिला निर्घृणपणे संपवलं आणि नंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.