८ मे २०२६
पुणे म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो इथला ऐतिहासिक वारसा आणि काळानुसार बदलत गेलेली संस्कृती. आधुनिकतेच्या या झगमगाटात अनेक जुने व्यवसाय काळाच्या पडद्याआड गेले असले, तरी पुण्यातील फडके हौद परिसरातील 'जिंतीकर वाडा' आजही एक वेगळी ओळख जपून आहे. गेली १५० वर्षांहून अधिक काळ पत्रावळी आणि द्रोण विक्रीची परंपरा जिद्दीने पुढे नेणाऱ्या जिंतीकर कुटुंबाची ही गोष्ट, केवळ एका व्यवसायाची नसून ती पुण्याच्या सांस्कृतिक दस्तऐवजाची आहे. ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक समृद्धी आणि पारंपरिक व्यवसाय यासाठी ओळखले जाणारे पुणे शहर आजही अनेक जुन्या परंपरांना जपताना दिसते.
आधुनिकतेकडे जात असताना अनेक पारंपरिक व्यवसाय नामशेष होत असताना, काही कुटुंबे मात्र आपल्या पिढीजात व्यवसायाला चिकाटीने पुढे नेत आहेत. अशाच उदाहरणांपैकी एक म्हणजे फडके हौद परिसरातील जिंतीकर कुटुंब आणि त्यांचा 150 वर्षांहून अधिक जुना पत्रावळी-द्रोण बनवण्याचा व्यवसाय. फडके हौद येथील जिंतीकर वाडा हा केवळ वास्तू नसून, तो पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासाचा एक जिवंत दस्तऐवज आहे. या वाड्याचा इतिहास दीडशे वर्षांहून जुना असून, आजही त्याच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने पत्रावळी आणि द्रोण विक्री केली जाते. हा व्यवसाय सध्या रुपाली जिंतीकर सांभाळत असून, त्यांनी या परंपरेला नवसंजीवनी दिली आहे. रुपाली जिंतीकर सांगतात की, त्यांच्या कुटुंबाचा हा व्यवसाय पूर्वजांकडून चालत आलेला आहे.
जिंतीकर कुटुंब मूळचे नगर जिल्ह्यातील असून, भिगवण परिसरातून पुण्यात स्थलांतरित झाले. पुण्यात आल्यानंतर त्यांनी उपजीविकेसाठी विविध पर्याय शोधले आणि शेवटी पत्रावळी-द्रोण बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला हा व्यवसाय पूर्णपणे हाताने केला जात असे. त्या काळी द्रोणांचा आकार वेगळा होता आणि त्यांची रचना अधिक पारंपरिक होती. काळानुसार या व्यवसायात बदल होत गेले. पूर्वी 100 द्रोण केवळ 20-25 रुपयांना विकले जात होते, तर आज त्याच द्रोणांची किंमत 40-50 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मात्र, वाढत्या प्लास्टिकच्या वापरामुळे या व्यवसायाला मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
तरीही धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सव, प्रसाद वितरण आणि पारंपरिक समारंभांमध्ये पत्रावळी-द्रोणांची मागणी कायम आहे. जिंतीकर कुटुंबाची आणखी एक खासियत म्हणजे त्यांचा सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्राशी असलेला संबंध. बापूसाहेब जिंतीकर हे पोस्टमन युनियनचे अध्यक्ष होते आणि त्यांनी सामाजिक कार्यातही मोठे योगदान दिले. पुणेरी पगडी परंपरेचे ते अखेरचे प्रतिनिधी मानले जात. तसेच त्यांचा तमाशा आणि लावणी क्षेत्रातील नामवंत कलाकारांशीही जवळचा संबंध होता.
आजच्या आधुनिक युगात मशीनच्या सहाय्याने पत्रावळी तयार केल्या जात असल्या तरी, जिंतीकर कुटुंबाने पारंपरिकतेचा गाभा जपण्याचा प्रयत्न केला आहे. लहान, मध्यम आणि मोठ्या आकारातील द्रोण, सपाट पत्रावळी, तसेच विविध प्रकारचे पर्यावरणपूरक उत्पादने ते आजही विक्री करतात. पर्यावरणपूरक आणि यूज अँड थ्रो स्वरूपामुळे या उत्पादनांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रुपाली जिंतीकर यांचे म्हणणे आहे की, हा व्यवसाय केवळ उपजीविकेचे साधन नाही, तर आमच्या कुटुंबाचा अभिमान आणि वारसा आहे. आजच्या पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचवणे आणि ही परंपरा जपणे हे आमचे कर्तव्य आहे. पुण्यासारख्या वेगाने बदलणाऱ्या शहरात, जिंतीकर कुटुंबाचा हा प्रयत्न केवळ व्यवसाय नाही, तर सांस्कृतिक जतनाचे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
Copyright ©2026 Bhramar