सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने सोनं खरेदी करावं की नाही हा प्रश्न पडलेला आहे. सोन्याचे दर १ लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. सोन्याच्या दर हे १,०३,३१० रुपयांवर पोहचले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचे दर वाढल्याने खरेदीदारांच्या खिशाला फटका बसत आहे.
आता अशातच कोणी 30 हजार रुपये प्रतितोळा दराने सोने देतो असं म्हटलं तर आपण ते नक्कीच घेऊ किंवा घेण्याचा विचार तरी करू. पण हाच विचार एकाला चांगलाच महागात पडला आहे. भोर तालुक्यातील निगडे गावच्या हद्दीत 16 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान धक्कादायक घटना उघडकीस आली. स्वस्त सोनं मिळवून देतो, असे सांगून एकाला तब्बल साडेदहा लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा तुपे, राहुल चव्हाण आणि बुवा ठाकुर या तिघांनी संगनमताने जयकुमार बाबासाहेब नरदेकर यांचा विश्वास संपादन केला. त्यांना 30 हजार रुपये प्रतितोळा दराने सोने देतो, असे सांगितले. त्यांच्या आमिषाला नरदेकर बळी पडले. तिघांनी नरदेकर यांना निगडे गावात पैसे घेऊन बोलावले. तेथे रोख साडेदहा लाख रुपये या तिघांना दिले. मात्र, त्यानंतर त्या तिघांनी सोने न देता नरदेकर यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. आता या प्रकरणात अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.