पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने चक्क सासऱ्याच्या घराला आग लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आला आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, कविता किसन फेंगसे (वय ४१, रा. काळुबाई कॉलनी, सुतारदारा, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी साहील हनुमंत हाळंदे (वय २५, रा. भूगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
कविता फेंगसे यांना तीन मुली असून त्यातील दोघींचा विवाह झाला आहे. तेजल हिचा साहील हाळंदे याच्याशी विवाह झाला आहे. त्यांना एक मुलगा आहे. तेजल हिची सासु कविता हाळंदे यांचा तक्रारदार यांना फोन आला. साहील कोणत्यातरी मुलीसोबत फिरतो. त्यामुळे तेजल व साहील यांचे भांडण झाले आहे. तरी तेजल हिला दोन दिवसांसाठी माहेरी पाठविते, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार तेजल सात महिन्यांच्या बाळाला घेऊन २६ नोव्हेंबर रोजी माहेरी आली.
२८ नोव्हेंबर रोजी तेजल हिला साहीलचा फोन आला. तू माहेरी का गेलीस म्हणून तिच्याशी फोनवर भांडण केले. त्यावेळी तक्रारदार यांनी माझ्या मुलीसोबत नीट संसार करा, नाहीतर मुलगी सासरी पाठविणार नाही, असे म्हणाल्या. साहील ऐकत नसल्याने त्यांनी दुसर्या मुलीला हा प्रकार सांगितला. तिने साहीलला खूप समजाविण्याचा प्रयत्न केला. तरी तो ऐकत नव्हता. नंतर त्यांनी २९ नोव्हेबरला भरोसा सेल येथे साहील हाळंदे याची तक्रार केली.
मुलगा आजारी असल्याने ४ डिसेबर रोजी रात्री उशिरा ते मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यावेळी रात्री ९ वाजता साहीलचा तेजल हिला फोन आला. त्यांनी हॉस्पिटलमध्ये असल्याचे सांगितले. तरी तो सतत कॉल करत होता. रात्री सव्वा दहा वाजता साहीलचा फोन आला व तो धमकावू लागला. “आताचे आता तू इथे ये, मी तुझ्या आईच्या घराजवळ आलो आहे. तू ५ मिनिटांत जर घरी नाही आलीस तर तुझ्या आईचे घर जाळून टाकेन तसेच तुला पण बघुन घेइन” अशी धमकी दिली.
त्यामुळे त्या घाबरुन मैत्रिणीच्या घरी गेल्या. मध्यरात्री पाऊण वाजता त्यांना फोन आला. तुमच्या घरातून धुर येत आहे. त्या घरी आल्या. तेव्हा शेजारील लोक, पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी त्यांच्या घराला लागलेली आग विझवत होते. काही वेळात संपूर्ण आग विझली. आगीत घरातील संसारोपयोगी वस्तु, कपाटे, कपडे, गाद्या, भांडी, टिव्ही व इतर सर्व घरातील वस्तु अर्धवट जळून खुप मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक संदीप पवार करीत आहेत.