गणपती विसर्जनाच्य पूर्वसंध्येला पुण्यात १८ वर्षीय युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षी एक सप्टेंबर रोजी दोन टोळ्यांमध्ये झालेल्या वादात आंदेकर टोळीचा आधारस्तंभ व माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा खून करण्यात आला होता. त्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष याला घराच्या पार्किंगमध्ये काल गोळ्या घालून खून करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा खून आंदेकर टोळीने केला आहे.
18 वर्षीय आयुष महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. तो क्लासवरून घरी येत असताना पार्किंगमध्येच त्याच्यावर हल्ला झाला. नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे ही घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला ससून रूग्णालायत दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले. ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत आणि विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीच्या काळामध्ये झालेल्या या खुनामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
शहरात गेल्या आठवड्यापासून ‘वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला’ याविषयीची चर्चा सुरू होती. या प्रकरणी रेकी करणार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. भारती विद्यापीठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट उधळण्यात आला होता. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली; तसेच खुनाच्या कटात सहभागी असलेल्यांची नावेही समोर आली होती. आंदेकर टोळीच्या सदस्यांना पाच पिस्तुलं पुरवण्यात आली होती. त्यातील दोन पिस्तुल पोलिसांनी जप्त केली. उर्वरीत तीन पिस्तुलं आणि आरोपींचा शोध सुरू होता. त्यापूर्वीच नाना पेठेमध्ये ही खुनाची घटना घडली.
1 सप्टेंबर 2024 रोजी वनराज आंदेकर याचा नाना पेठेत डोके तालीम परिसरात कोयत्याने वार करून आणि गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोम्या गायकवाड, गणेश कोमकर आणि इतर आरोपी होते. वनराज आंदेकरच्या अंत्यविधीवेळी आंदेकर टोळीच्या सदस्यांनी शस्त्रपूजन करून खुनाचा बदला घेण्याची शपथ देखील घेतल्याची माहिती आहे. ही माहिती शहर पोलिस दलातील अधिकार्यांना आणि गुन्हे शाखेलाही मिळाली होती.
त्यानुसार वनराज आंदेकरच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होत असताना, भारती विद्यापीठ परिसरात आंदेकर टोळीने एकाच्या खुनाचा कट रचला होता. तो कट भारती विद्यापीठ पोलिसांमुळे उधळून लावण्यात आला होता. मात्र, नाना पेठेतील कट पोलिसांना उधळता आला नाही यामध्ये आयुषचा बळी गेला.