पर्यावरण वाचवा, पर्यावरणाबरोबरच निसर्गातील परिसंस्थाही वाचवा असं सांगणारा माणूस गेला. भारताचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, पश्चिम घाट तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष, नामवंत विचारवंत आणि निसर्गप्रेमी डॉ. माधव गाडगीळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटल येथे ७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता अखेरचा श्वास घेतला.
डॉ. गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरण, जैवविविधता आणि परिसंस्था संवर्धनासाठी आयुष्यभर झटणारा एक प्रखर आवाज, अभ्यासू मार्गदर्शक आणि संवेदनशील शास्त्रज्ञ देशाने गमावला आहे.माधव गाडगीळ यांच्या निधनानंतर पर्यावरण आणि परिसंस्था संवर्धनासाठी सातत्याने आवाज उठवणारा एक विद्वान मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
माधव गाडगीळ यांचं काल रात्री अल्पशा आजाराने पुण्यात निधन झालं. गुरुवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. गाडगीळ यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या ‘ए-१८, स्प्रिंग फ्लॉवर अपार्टमेंट, पंचवटी, पाषाण’ या निवासस्थानी सकाळी ठेवण्यात आले आहे.
माधव गाडगीळ यांच्या निधनानंतर पर्यावरणप्रेमींमध्ये दुःखाचं वातावरण आहे. त्यांचं पर्यावरण क्षेत्रातील योगदान अत्यंत अतुलनीय आहे. डॉ. माधव गाडगीळ यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य निसर्ग आणि पर्यावरणाच्या अभ्यासासाठी समर्पित केले होते. गाडगीळ समितीचा अहवाल फार महत्त्वाचा ठरला. पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी त्यांनी दिलेला ‘गाडगीळ समितीचा अहवाल’ आजही पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.